नागपूर -राज्यात नवे सरकार स्थापन होऊन केवळ 15 दिवस झाले आहेत. अद्यापही नवीन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही, तरी देखील ओबीसी समाजाच्या ( OBC Political Reservation ) राजकीय आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावा करत आहेत. यावर माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बांठीया आयोग आमच्या सरकारने नेमला होता. आयोगाला ट्रिपल टेस्ट करण्याचे निर्देश आमच्या सरकारने दिले, न्यायालयात वकील आम्ही नेमले, आयोगाचा अहवाल आम्ही सत्तेत असताना आला. तर मग हे सरकार आमच्या मेहनतीचे श्रेय कसे घेऊ शकते, असा प्रश्न माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार ( Former OBC Minister Vijay Wadettiwar ) यांनी विचारला आहे.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण बहाल झाल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगल्याचे बघायला मिळत आहे. तत्कालीन राज्यकर्ते जे आता विरोधी बाकावर बसलेले आहेत. त्यांनी याचे श्रेय आमच्या सरकारचे आहे, असा दावा केला आहे. तर नुकतेच सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नव्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाले असल्याचा दावा केला आहे. यावर माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.