नागपूर - मला महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री बघायचा आहे, असे वक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले ( Raosaheb Danve On Brahmin CM ) होते. यावर प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 'मुख्यमंत्री हा जातीपातीचा नसून, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारा असावा', असे म्हणत 'लोकांनी विष पेरू नये', असा टोला दानवेंना ( Vijay Wadettiwar Criticized Raosaheb Danve ) लगावला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
फडणवीसांनीही चांगले काम केले :मुख्यमंत्री यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असावी. ही गुणवत्ता असली पाहिजे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, असे म्हणत मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री बघताना जात- पात, धर्माची भावना नसावी. यात जाती -धर्मात विष पेरण्याचे काम करू नये, अशा शब्दात रावसाहेब दानवे याचे नाव न घेता प्रतिउत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनीही चांगले काम केले, असे म्हणत टोला लगावला.
पावसाळ्यात निवडणूका होऊ शकणार नाही असे चित्र आहे :ओबीसींच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यावर मुख्यमंत्री यांची बैठक झाली. पण अद्याप पुनर्विचार याचिका टाकण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयावर मत मतांतरांवर चर्चा झाली. यात निवडणूक प्रक्रिया सुरू करायला, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदसाठी नोटिफिकेशन निघाले नाही. त्यामुळे या परिस्थितीत सर्व प्रक्रिया पूर्ण करायला किमान एक दीड महिना लागेल. तोपर्यंत पावसाळा सुरू होतो. त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घेता येत नाही. पूर, पाऊस, यासह अनेक अडचणी असतात. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत निवडणुका होणार नाही, असे चित्र आहे. पण यावर राज्य निवडणूक आयोग कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे निर्णय घेईल. शिवाय मध्यप्रदेशच्या याचिकेवरही निर्णय येईल. त्यानंतर महाराष्ट्र सरकार भूमिका घेईल. हा निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर ठेवून हा ओबीसीचा आरक्षणाचा विषय समोर घेऊन जाऊ असेही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यावेळी म्हणालेत.