नागपूर- उपराजधानी नागपूरमध्ये केवळ वैयक्तिक वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने १६ वर्षीय विद्यार्थी राज पांडेचा निर्घृण खून केल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. त्यातच आता राजने गायलेले गाणे समाज माध्यमांवर वायरल झाले. त्यापैकी 'आयेगी तुम्हे मेरी याद वफाये मुझे भूल ना पयोगे' या गाण्याने तर संपूर्ण इंदिरा मातानगर या वस्तीमधील नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
वैयक्तिक वादाचा बळी ठरलेला राज हा उत्तम गायक होता. त्याच्या वस्तीतील लहान मुले त्याच्याकडे नेहमीच गाणे गाण्यासाठी हट्ट धरायचे. तो खड्या आवाजात गात असल्याने इंदिरा मातानगरातील मुले त्याच्या आवाजाला दाद देत असत. त्याने गायलेले अनेक गाणे मित्रांनी रेकॉर्ड करून वायरल केले आहेत. मात्र "आयेगी तुम्हे मेरी याद वफाये मुझे भूल ना पयोगे..करोगे फरियाद रो रो के किसी को बता न पाओगे" हे गाणे त्याच्या खुनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर अगदी प्रत्यक्षात उतरेल, असा विचार कुणीही केला नव्हता.
हेही वाचा-धुळे : शिरपूर शहराजवळ बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त
आरोपीला फाशी द्या-
राजचा खून झाल्याची बातमी संपूर्ण इंदिरा मातानगर वस्तीत वाऱ्यासारखी पसरली. रोज आवाजात गाणे ऐकायला मिळायची तो आवाज कायमचा शांत झाल्याचे वृत्त नागरिकांना सहन होत नव्हते. आमच्या राजचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.