नागपूर -जिल्ह्यातील ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज बिल माफीच्या नावाने फसवणूक करण्याचे काम केल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी केला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्या साधत नागपूरच्या इतवारी परिसरातील विदर्भ चंडिका माता मंदिर परिसरात आजपासून (सोमवार) बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. शहिद स्तंभाला वंदन करत या आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.
'मोदी सरकारला बुद्धी दे'
मोदी सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारण वेगळे राज्य निर्माण करण्याचा अधिकार हा केंद्रात असलेल्या भाजपाचा सरकारचा असल्याने त्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे वामनराव चटप यांनी सांगितले आहे. हे आंदोलन बेमुदत असून यामध्ये विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील नागरिक सहभागी होणार आहे. महाराष्ट्र्र सरकार आर्थिकदृष्ट्या मृत पावले आहे. राज्यावर उत्पन्नाच्या तुलनेत मोठे कर्ज आहे, यामुळे विदर्भ हा महाराष्ट्रात 100 वर्ष सोबत राहिला तरी विकास होऊ शकत नाही, यामुळे विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे, ही मागणी आहे. या मोदी सरकारला बुद्धी दे, असे म्हणत चंडिका मंदिरात यावेळी पूजा करण्यात आली.