नागपूर - राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरातही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून 'ढोल वाजवा सरकार जागवा' आंदोलन राम नगरमधील हनुमान मंदिरासमोर करण्यात आले. 'राज्य शासनाने बार उघडलेत मग मंदिरे का बंद'? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेकडून 'महाआरती' कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील सर्वच प्रार्थना स्थळे व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेकडूनही मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी 'ढोल वाजवा' आंदोलन करण्यात आले.
एकीकडे राज्यशासनाकडून राज्यातील बार सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु मंदिरे मात्र अद्यापही बंदच आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी 'ढोल वाजवा सरकार जागवा' अशा आशयाच्या घोषणा देत हे आंदोलन करण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री अरुण नेटगे यांनी सांगितले.
या आहेत विश्व हिंदू परिषदेच्या मागण्या-
विश्व हिंदू परिषदेने शहरातील सर्वच मुख्य मंदिरांसमोर आंदोलन केले. त्याचबरोबर महाआरती करत शंखनादही करण्यात आला. महाराष्ट्रात बहुतांश सर्वच आस्थापना व सामाजिक स्थळे सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाने मंदिरेही तात्काळ सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी आंदोलनात करण्यात आली. सध्या सर्वच हिंदू सण उत्सवाचा काळ सुरू आहे. अशावेळी मंदिरे बंद असल्याने सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिराबाबत महाराष्ट्र सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी कराण्यात आली. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.