नागपूर -राज्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहे. विशेत: काही दिवसांपूर्वी 20 ते 30 रुपये किलो असणारा टोमॅटो सध्या 80 रुपये किलो दरात विकला जात आहे. हे दर फक्त उपराजधानी नागपुरात नसून महाराष्ट्रातील अनके जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आहे. नागपूरच्या बाजारात टोमॅटोची आवक घटल्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.
सध्या शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये समान दर पाहायला मिळत आहे. गोकुळपेठ बाजारात येणाऱ्या ग्राहकांनी टोमॅटोचे वाढलेले दर लवकर आटोक्यात येणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. यात बरेचदा भाजीपाल्याचे दर घसरले की शेतकऱ्यांवर ते भाजीपाला फेकून देण्याची वेळ येते. त्यामुळे ना फेकण्याची वेळ यावी, ना महागात विकत घेण्याची वेळ, अशी प्रतिक्रियाही ग्राहकांनी दिली आहे. तर टोमॅटो हा दररोजच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असल्याने घेणे आवश्यक असते. मात्र दर वाढल्यामुळे टोमॅटो विकत घेणे कठिण झाले आहे, अशी भावनाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हिवाळ्यामुळे अनेक भाज्यांचे दर हे 10 रुपयाच्या घरात आहे. यात टोमॅटोची आवक घटल्याने दर वाढले आहे. यात टोमॅटो 60 रुपये किलो किरकोळ बाजारातील दर आहे. तेच इतर बाजारात 80 रुपये आहे. यात पालक, भेंडी, चवळी, शिमला मिरची, वांगे यांचे दर कमी असल्याचेही भाजी विक्रेते सांगतात.