नागपूर- गांधीसागर तलावात हात, पाय आणि शीर नसलेला अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंद करून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
नागपूर : गांधीसागर तलावात शीर, हात अन् पाय नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ - Police
गणेशपेठ पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून आरोपींनी दुसऱ्या ठिकाणी त्याची हत्या केल्यानंतर त्याचे शीर धडापासून वेगळे केले. एवढेच नाही तर हात आणि पाय देखील वेगळे केले. यानंतर केवळ धड प्लास्टिकच्या पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकून दिले.
हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. यानंतर गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आरोपींनी अज्ञात व्यक्तिची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी, यासाठी मृतदेह गांधीसागर तलावात फेकून दिला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.