महायुतीमधील सत्ता संघर्ष शमविण्यासाठी गडकरी मुंबईकडे रवाना, राजकीय हालचालींना वेग - Nitin Gadkari leaves for Mumbai
विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून १५ दिवस झाले असताना देखील राज्यात अजून सरकार स्थापन होत नाही आहे. हा सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
नागपूर -दिवसेंदिवस सत्ता स्थापनेचा गुंता वाढत असल्याने भाजप आणि शिवसेनेमधील संबंध ताणले गेले आहेत. एवढंच नाही तर 25 वर्षांची युती तुटण्यावर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीचे निकाल लागून 15 दिवस झाले तरीही राज्यात अजूनपर्यंत नवीन सरकार स्थापन झालेले नाही. भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसले असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षाचा वाद विकोपाला गेला असताना तो सोडवण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थ म्हणून नेमण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आज नितीन गडकरी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.