नागपूर - २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसाच्या कालावधीमध्ये महाआवास अभियानाच्या माध्यमातून विविध घरकुल योजनांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.
५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
नागपूर जिल्ह्यात तब्बल ४१, ७३२ घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी २१, ६१८ घरकुले पूर्ण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र मंजुरीकरिता प्रलंबित असलेल्या ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांकडे बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जागा मिळून देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यास घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. लाभार्थी निवडीसाठी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. ही बाब विचारात घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे.