नागपूर -कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आता कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा बीए -५ ( BA-5 Omicron variant Nagpur ) या उपप्रकाराचे २ रुग्ण नागपुरातही आढळून आले आहेत. नागपूर महानगर पालिकेच्या ( Nagpur Municipal Corporation ) वतीने करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे सबव्हेरियंट आढळून आले आहेत. रुग्ण संख्या आटोक्यात असल्याने रूग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची करण्याची गरज नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी ( Municipal Commissioner Radhakrishnan b ) यांनी स्पष्ट केले आहे. या दोन रुग्णामध्ये एक महिला आणि एका पुरुष रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांचा क्वारंटाईन म्हणजेच विलगीकरण कालावधी पूर्ण होऊन दोन्ही रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर महानगर पालिकेतर्फे विशेष उपायोजना सुरु करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली आहे. पात्र नागरिकांनी बूस्टर डोज तत्काळ घेतला पाहिजे, असे देखील मनपा आयुक्त म्हणाले आहेत. याशिवाय १२ ते १८ वर्षेवयोगटासाठी लसीकरण कॅम्प घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.