नागपूर- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुन्हा एकदा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आाला. दोन दिवसांसाठी लागू केलेल्या या जनता कर्फ्यूला आजपासून सुरुवात झाली आहे. मनपा प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनी घरीच राहून जनता कर्फ्यूला पाठिंबा दर्शवला आहे. महत्वाचे म्हणजे जुलै महिन्यात सुद्धा जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले होते, त्यावेळी नागरिकांनी उस्फूर्तपणे जनता कर्फ्युचे पालन केले होते. आता दुसऱ्यांदा लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूला सकाळच्या सत्रात नागपूरकरांनी योग्य प्रतिसाद दिलेला आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी
नागपुरात दोन दिवसीय जनता कर्फ्यूला सुरुवात, नागरिकांचा योग्य प्रतिसाद - janata curfew amid corona
नागपुरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. महापौरांच्या आवाहनाला जनतेनेही उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आज सकाळच्या सुमारास तरी दिसून येत आहे.

उपराजधानी नागपुरात कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. दर दिवसाला दीड ते दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधित आढळून येत असल्याने अनेक सामाजिक संघटनांसह, राजकीय पक्षांनी आणि सामान्य नागरिकांकडून जनता कर्फ्यूची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, जनतेच्या या मागणीस मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी नकार दर्शवला होता. त्यानंतर जन प्रतिनिधिंच्या मागणीला अनुसरून महापौर संदीप जोशी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.
सप्टेंबर महिन्यांतील उर्वरित शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्युचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार आज पहिल्या जनता कर्फ्युचा पहिला दिवस असल्याने सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळेल या संदर्भात शंका व्यक्त केली जात होती. मात्र कोरोनाच्या साखळी तोडण्यासाठी नागपुरकरांनी पुन्हा एकजूट दाखवत जनता कर्फ्युला यशस्वी करण्याचा निश्चय केलेला दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जनता कर्फ्यू सारख्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे नागपूरकर मात्र काही दिवसातच सर्व नियम आणि कायदे विसरून पुन्हा बेफिकिरीचे दर्शन घडवत असल्यानेच नागपुरात कोरोना इतका फोफावलेला आहे.