नागपूर- नागपूर गुन्हे शाखेच्या परिमंडळ दोनच्या पथकाने बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. निलेश राजू कडवे आणि मारुफ खान रफिक खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोपींनी बनावट नोटा छापण्याचा आणि चलनात आणण्याचा गैरप्रकार सुरू केला होता, असा खुलासा झाला आहे.
संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० च्या बनावट नोटा केल्या जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपींनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खोली भाड्याने घेतली होती. त्या ठिकाणी दोन्ही आरोपी नोटा छापण्याचे काम करायचे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी मानकापूर येथील एकात्मता नगर परिसरातील आरोपींच्या खोलीवर धाड घातली. पोलिसांनी त्या खोलीतून बनावट नोटा छापण्यासाठी उपयोगात येत असलेले संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.