नागपूर -लखीमपूर येथे शेतकरी नरसंहारच्या घटनेनंतर त्याचे पडसाद म्हणून आज (सोमवारी) महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली. मात्र व्यापारी वर्गाकडून या बंदला विरोध दर्शवला आहे. 'बंद करायचा असेल तर सरकारी कार्यालय बंद करा, आम्हाला बकरा का बनवतात', असा सवाल नागपुरातील व्यापाऱ्यांनी केला आहे. सकाळपासून नागपूरच्या विविध भागात आंदोलनाला सुरुवात झाली. शहरातील सक्करदरा चौकसह नागपूरच्या सीताबर्डी बाजापेठेतील व्हेरायटी चौकात गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत घोषणाबाजी आणि विरोध प्रदर्शनाला सुरुवात झाले. काही वेळ आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेधार्थ धरणे दिले. त्यानंतर सर्व पक्षाचे नेते सीताबर्डी बाजारकडे वळले.
कुठे बंद तर कुठे सुरु
सकाळची वेळ असल्याने काही दुकाने बंद असल्याचे पहायला मिळाली. तर काही दुकाने आंदोलकांच्या अंदाज घेत अर्धवट खुली होती. यावेळी आंदोलक हे दुकानासमोर जाणवून घोषणाबाजी करत होते. तर काही जण दुकाना 10 मिनिटांसाठी तरी बंद करा, असेही काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणत असल्याचे पहायला मिळाले. यात काही व्यापाऱ्यांनी स्वत: दुकाने बंद ठेवले होते. एकंदरितच आंदोलन हे केवळ 10 मिनिटांसाठी होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला होता बंदला विरोध
नागपूरच्या नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने बंदला विरोध दर्शविला होता. लखीमपुरात झालेल्या शेतकरी हिंसाचार घटनेचा निषेध आहे. पण आजच्या घडीला एक दिवस बंद ठेवले तरी लोक हे ऑनलाइन बाजारपेठेकडे वळतात. त्यामुळे ज्या व्यपाऱ्यांना स्वच्छेनुसार बंद ठेवायचे त्यांनी ठेवावे.मात्र कोणत्याही व्यापाऱ्याला आग्रह करू नये, पोलीस प्रशासनाने व्यापारांसोबत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले होते. त्यानुसार काहीनी स्वत:हून सकाळच्या वेळेत दुकाने बंद ठेवल्याचे पाहायला मिळाले.