नागपूर -शहरात व्यापारी संघटनांनी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या निर्बंधांना विरोध दर्शविला. यात सरकार जागवा, व्यापार वाचवा संघर्ष कृती समितीच्या वतीने हिसलॉप कॉलेज मार्गावरून बाईक आणि कार रॅली काढण्यात आली. भारतीय ध्वज हातात घेत ही रॅली काढण्यात आली. यात व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत या कार रॅलीने लक्ष वेधून घेतले.
काय मागणी?
कोरोनाची दुसरी लाट ओसरतानाचे चित्र निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. यात राज्यात रुग्णसंख्या आणि कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर पाहता पाच स्तर तयार करण्यात आले आहे. यात नागपुरात कोरोनाची परिस्थितीचा स्तर पहिल्या क्रमांकावर असताना तिसऱ्या स्तराचे निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे दुपारी 4 वाजता दुकाने बंद करावे लागत आहे. या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. सातत्याने सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. यात मंगळवारी बँड बाजा वाजत पायदळ रॅली काढून व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारने व्यापार संबंधातील निर्णय शिथिल व्हावे, यासाठी आंदोलन केले. आजच्या बाईक रॅलीनंतर सरकारने सकारात्मक विचार न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करत पुढचे पाऊल उचलण्यात येईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.