नागपूर -नागपूर विभागाच्या पदवीधर निवडणुकीचे मतदान काल शांततेत पार पडल्यानंतर आज अंतिम टक्केवारी पुढे आली आहे. नागपूर विभागात ६४.३८ टक्के मतदान झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या मनात धडकी भरली आहे. २०१४ साली झालेल्या या निवडणुकीत केवळ ३७ टक्के मतदानाची नोंद झाली होती, मात्र यावेळी तब्बल २७ टक्क्यांनी मतदान वाढले असल्यामुळे भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असल्याची चर्चा सुरू झाली आहे, कारण गेल्या ५८ वर्षांपासून या मतदार संघात भाजपचाच कब्जा राहिलेला आहे. ही शक्यता सत्यात उतरल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकरिता मोठा झटका असणार आहे. हे सर्व तर्क-वितर्क असले तरी उद्या मतमोजणीनंतरच नेमके चित्र स्पष्ठ होणार आहे. मात्र त्याआधी या तर्कवितर्कांमुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा -बॉलिवूड मुंबईतून काही हलणार नाही- रामदास आठवले
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणजे भाजप असे समीकरण गेल्या ५८ वर्षांपासून राज्यात तयार झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिवंगत गंगाधरराव फडणवीस, पंडित बछयराज व्यास आणि अनिल सोले सारख्या नेत्यांनी पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व केलेलं आहे. गेल्या निवडणुकीत प्राध्यापक अनिल सोले यांनी अगदी आरामात विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसचे उमेदवार ऍड अभिजित वंजारी यांनी सुमारे वर्षभरापूर्वी पासूनच तयारी सुरू केली होती तर ऐन वेळेवर भाजपने महापौर संदीप जोशी यांच्या गळ्यात उमेदवार पदाची माळ टाकल्याने त्यांना फार काही करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे देखील निकालासंदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
वाढीव मतदान कुणासाठी धोक्याचे