नागपूर- कोरोनानंतर राज्यात मूक्यरमायकोसिस या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या बुरशीजन्य संसर्गाने आतापर्यंत नागपुरात तब्बल २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ६०० हून अधिक जणांना याचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'600 म्यूकरमायकोसिस रूग्णांना बरे करण्यात यश'
गेल्या मार्चपासून आतापर्यंत तब्बल 600 हून अधिक रुग्णांना म्यूकरमायकोसिसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले असल्याचा दावा विदर्भातील कान-नाक-घसा डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत निखाडे यांनी केला आहे. मात्र 284 जणांना याची बाधा झाली असून 7 जणांच्या मृत्यूची नोंद शासन दरबारी असल्याचे समोर आले आहे. पण संघटनेकडून घेण्यात आलेल्या आकडेवारीत 26 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोना रूग्णांना काळजी घेण्याची गरज
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यात रुग्णांनी घरी जाण्यापूर्वीची मुखरोगाचे परीक्षण केल्यास अधिक फायद्याचे ठरू शकते. शिवाय घरी गेल्यानंतरही वेळोवेळी शुगरची चाचणी करून घेत प्रमाण तपासत राहिले पाहिजे. यासोबत काही लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नये असेही सांगितले जात आहे.