नागपूर - दुचाकी चोरी करून त्या गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात कमी किमतीत विकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना नागपूर शहरातील सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एकूण पाच दुचाकी वाहन जप्त केले आहेत. महत्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेले तिघेही विद्यार्थी आहेत. मौज मज्जा करण्याकरिता आणि महागड्या वस्तूंचा शौक पूर्ण करण्याकरिता या तिघांनी चोरीचा धंदा सुरू केला होता, याचा देखील खुलासा झालेला आहे.
धनंजय पाटील - पोलीस निरीक्षक, सक्करदरा पोलीस स्टेशन - मौज करण्यासाठी चोरल्या दुचाकी -
आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली येथून शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून भलतेच उद्योग करण्यास सुरुवात केली. नागपूर शहराची झगमगाट भरलेली दुनिया बघून त्यात होरपळून निघालेल्या दोघांनी मौजमज्जा करण्यासाठी व पैसे मिळवण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरीला सुरुवात केली. त्या दोघांनी शिताफीने तब्बल पाच दुचाक्या देखील चोरल्या. मात्र, ते पोलिसांच्या नजतेतून सुटू शकले नाहीत. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणात एकूण तिघांना अटक केली आहे.
- नागपूरच्या दुचाकींची गडचिरोलीत विक्री:-
मध्य भारतात सर्वाधिक दुचाकीची संख्या नागपूर शहरात आहे. या तुलनेत वाहन चोरी होण्याचं प्रमाण देखील नागपुरात सर्वाधिक आहे. नागपूर शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरायची आणि ती गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात नेऊन अल्पदरात विकायची हा उद्योग या तरुणांनी सुरू केला होता. गाडी विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून महागडे कपडे, मोबाईल घेण्याचा शौक त्यांना लागला होता. नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना अचानक वाढल्या होत्या. चोरट्यांना जेरबंद करण्याकरिता पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाहन चोरी प्रकरणात दोघांची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्यालासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण पाच दुचाकी वाहन गडचिरोलीच्या दुर्गम भागातून जप्त केले आहेत.