नागपूर -गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी विविध कारणांनी वादात अडकल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आज पुन्हा तीन कर्मचारी निलंबित झाल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लकडगंज येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात दारू आणि मटणाची पार्टी केल्याने तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी लोहित मतानी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
हेही वाचा -Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल, एनआयएकडून जप्त गाड्यांची तपासणी सुरू
नागपुरच्या शांती नगर परिसरात असलेल्या लकडगंज साहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात चार पोलिसांनी चक्क दारू आणि मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कार्यालयातील सर्व कर्मचारी घरी गेल्यावर या कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केली. सध्या या पार्टीची पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे पार्टी करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० मार्च रोजी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एका प्रकरणातील तक्रारदाराला त्याचे काम करून देण्याचे आश्वासन देऊन या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून पार्टी उकळली होती, त्यावेळी त्या तक्रारदाराने संपूर्ण पार्टीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉड केला होता. पार्टी दिल्यानंतर देखील या चारही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तक्रारदाराचे काम करून देण्यास टाळाटाळ केली असता त्यांनी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात रंगलेल्या दारू आणि मटण पार्टीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी