नागपूर नागपूर शहरात एक असे शासकीय कार्यालय Government office आहे. जिथे दिवसाच्या कामाची सुरुवात अतिशय वेगळ्या पद्धतीने केली जाते. हे कार्यालय आहे, जनरल पोस्ट ऑफिस म्हणजेच सर्वांच्या परिचयाचं जीपीओ. नियमानुसार जीपीओचे कार्यालय सुरू होण्याची वेळ ही सकाळी 10 वाजताची आहे. मात्र या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे आधीच कार्यालयात दाखल होतात आणि त्यानंतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी एकत्रित येऊन राष्ट्रगान गाऊनचं कामाला सुरुवात करतात. हा नित्यक्रम गेल्या 12 वर्षांपासून अविरतपणे असाच सुरू आहे. सध्या पोस्टल वीक सुरू आहे. त्या अनुषंगाने ही आगळीवेगळी आणि तेवढीच रोचक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
सकाळी एखाद्या शासकीय कार्यालयाचे काम सुरू होताना, किती निरुत्साह असतो. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे काही कामानिमित्त कार्यालयात आलेल्या लोकांना याचा फारसा चांगला अनुभव येत नाही. सरकारी काम 4 दिवस थांब अशी अवस्था सरकारी कार्यालयांमध्ये बघायला मिळते. मात्र नागपूरचं जीपीओ कार्यालय या सर्वांला अपवाद ठरलेलं आहे.
राष्ट्रगीता मागील उद्देश गेल्या 12 वर्षांपासून जीपीओ कामाची सुरुवात राष्ट्रगीतानंतर करण्याची परंपरा अविरतपणे जोपासण्यात आली आहे. जीपीओ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 12 वर्षात कधीही खंड पडू दिलेला नाही. 12 वर्षांपूर्वी नागपूर जीपीओला डिपार्टमेंट ऑफ सर्विस कॉलिटी मॅनेजमेंट तर्फे सर्वोत्तम सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून जीपीओचे कर्मचारी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रार्थना करतात. त्याच बरोबर राष्ट्रगीत गाऊन कामाची सुरुवात केली जाते. यामागचा उद्देश असा की, या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होते. आम्ही जे काम करतोय, तेही राष्ट्रहिताचं काम आहे. सकाळी राष्ट्रगीत गायल्यामुळे संपूर्ण दिवस चैतन्याच्या वातावरणात जातो. सर्वांच्या उत्साह कायम असतो.
कार्यालयात राष्ट्रगीत गाऊन केली जाते रोजच्या कामाची सुरुवात 100 वर्षे जुनी आहे जीपीओची इमारत नागपूरच्या जीपीओ इमारतीचं बांधकामाल 1916 झाली सुरुवात झाली होती. 1921साली संपूर्ण इमारत बांधून तयार झाली होती. शंभर वर्षांपूर्वी जीपीयूची इमारत बांधण्याकरिता सुमारे 5 लाख रुपयांचा खर्च आला होता. आज या इमारतीला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत. ऊन, वारा, पाऊस वादळाचा मारा सहन केल्यानंतर सुद्धा ही इमारत दिमाखात उभी आहे.
भारतीय टपाल सेवेचा गौरवशाली इतिहास भारतात टपाल व्यवस्थेची सुरुवात 17 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. 1688 मध्ये मुंबई आणि मद्रास येथे कंपनी पोस्टी कार्यालय स्थापन झाली होती. 1774 मध्ये टपाल सेवा ही सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्ट मास्तर जनरलची प्रथम नियुक्ती देखील त्याचवेळी करण्यात आली. 1837 साली भारतीय टपाल कायदा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून 1854 चा टपाल कायदा अस्तित्वात आला. त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एका अधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला 2022 पर्यंत त्यात कोणताही बदल झालेला नाही. देशभरात एक लाख 55 हजार 333 टपाल कार्यालय मार्फत भारतीय टपाल विभागाचा कारभार चालवला जातो. दूरवर आणि अवघड भागातही पसरलेला टपाल विभागाच्या जाळ्यामार्फत अनेक योजना देखील राबवल्या जात आहेत.