नागपूर -राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यानी केले आहे. नागपूरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. जवळपास 57 हजार अॅक्टिव्ह रूग्ण आहे. मृतांचा आकडा वाढत असल्याने लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवण्याची गरज आहे. राज्यसरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतले आहेत. यात वीकएन्ड लॉकडाऊन आणि काही पर्शियल लॉकडाऊन जाहीर केला आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेने अशा परिस्थितीमध्ये सहकार्य करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, केवळ लॉकडाऊन करून चालणार नाही तर महाराष्ट्रातच कोरोना का वाढतो आहे? यावर विवेचन झाले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर जिल्ह्यांतील आरोग्य व्यवस्था सक्षम करा -
मुंबई-पुणे ही महत्त्वाची शहरे आहेत. त्याठिकाणी विशेष लक्ष दिलेच पाहिजे. पण या दोन शहराच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. या इतर शहरांची आरोग्य व्यवस्था देखील राज्य सरकारच्याच हातात आहे. या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांना सक्षम केले पाहिजे. राज्यभरात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर होत आहे.