नागपूर -दोन दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने तब्बल २६ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या चकमकीत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे हादेखील मारला गेल्याने नक्षली चळवळीला खीळ बसेल का, याबाबत विविध मते व्यक्त होत आहेत. या संदर्भात नक्षल चळवळीचे अभ्यासक आणि जनसंघर्ष संस्थेचे संचालक दत्त शिर्के यांनी यासह विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
मिलिंद तेलतुंबडे याच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीमध्ये नक्षलवादी चळवळ मोठी झाली होती. त्याच्याकडे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात नक्षलवादी चळवळ मोठी करण्याची जबाबदारी होती. एवढेच नाही तर दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंडदेखील तोच होता. त्यामध्ये १७ जवानांना हुतात्मा झाले. त्यामुळे पोलिसांच्या चकमकीत तेलतुंबडेचा झालेला खात्मा हा पोलिसांचा खूप मोठा विजय असल्याचे मत नक्षल चळवळीचे अभ्यासक दत्त शिर्के यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-Naxals killed in Gadchiroli : चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार; अधिकृत माहिती समोर
नक्षलवादी चळवळीचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेचा जंगलात आणि ग्रामीण भागातील वावर हा सहज होता. तो सह्याद्री आणि दीपक नावाने प्रसिद्ध होता. मिलिंद तेलतुंबडेने कोळसा खाणीतील कामगार नेता ते नक्षलवादी चळवळीचा प्रमुख होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. अफाट नेतृत्व क्षमता असल्याने तरुण वर्ग त्याच्याकडे आकर्षित होत होता. मात्र, गेल्या काही वर्षात गडचिरोलीमधील नक्षलवादी चळवळ कमकुवत झाली. त्यानंतर चळवळीला बळकटी देण्यासाठी मिलिंद तेलतुंबडे प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठी खीळ बसली असल्याचे (Naxal Movement in Gadchiroli after death of Milind Teltumbde) मत नक्षलवादी चळवळीचे अभ्यास दत्त शिर्के यांनी व्यक्त केले आहे.