नागपूर- स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी ( Spinal Muscular Atrophy ) नामक दुर्मिळ आजाराने नागपुरच्या एका अवघ्या 16 महिन्यांच्या बाळाला ग्रासले आहे. विहान, असे या बाळाचे नाव आहे. डॉ. विक्रांत आणि मीनाक्षी आकुलवार यांचे बाळ असह्य वेदनांनी विव्हळत आहे. त्याच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपये किंमतीच्या इंजेक्शनची गरज ( Baby Needs 16 Crore Injection ) आहे. 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन विकत घेणे कोणत्याही सर्वसामान्य आई वडिलांसाठी अशक्य आहे. त्यामुळे आता क्राऊड फंडिंगच्या ( Crowdfunding ) माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यामध्ये अभिनेता सोनू सूद, अभिषेक बच्चन, मनोज बायपेयी या सारख्या अभिनेत्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विहान हा आता 16 महिन्यांचा आहे. त्याला पुढील 2 महिन्यात हे इंजेक्शन देणे गरजेचे आहे, उशीर झाल्यास इंजेक्शनचा प्रभाव कमी होईल अशी भीती त्याच्या आई वाडीलांना आहे.
नागपुरात राहणारे आकुलवार दाम्पत्याच्या घरी 16 महिन्यांपूर्वी एका गोंडस बळाने जन्म घेतला. बाळाच्या जन्माने आपले कुटुंब पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आकुलवार दाम्पत्याला होता. त्यांनी मोठ्या उत्साहात बाळाचे नाव विहान, असे ठेवले. बघता बघता विहान कधी एक वर्षांचा झाला हे त्यांना कळलेच नाही. विहानचा वाढदिवस कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत साजरा केला. इतर बाळांप्रमाणे विहानच्या शरीराची वाढ तर होत होती. पण, त्याच्यातील काही बाबींकडे आकुलवार दाम्पत्याला दुर्लक्ष करता आले नाही. विहानच्या पायातील बोटांमध्ये सजीवता होती. मात्र, त्याचे पाय निकामी होत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर सुरू झाला अनेक रुग्णालयाचा प्रवास.
विहानला स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी नामक आजार -सुरुवातीला नागपूरच्या डॉक्टरांकडे उपचार झाल्यानंतर विहानच्या आई वडिलांनी मुंबई गाठली. तेथेही फार काही फरक पडत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते बंगळुरूला गेले. अखेर तिथे विहानला स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी (एसएमए) नावाचा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार तसा दुर्मिळ असल्याने यावर उपचार करण्यासाठी खूप खर्च येईल याची कल्पना आकुलवार दाम्पत्याला आली होती. मात्र, जेव्हा यावर उपचारासाठी जगात एकच इंजेक्शन उपलब्ध असून त्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे कळताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. पुढील दोन महिन्यात हे 16 कोटी रुपये किमतीचे इंजेक्शन विहानला द्यावे लागणार असल्याने त्याचे आईवडील चिंतेत आहेत.