नागपूर : येथील गंगा-जमुना वस्तीत रविवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विदर्भ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने आंदोलक आणि विरोधी गटात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
गंगा-जमुना वस्तीत अवैध धंदे चालत असल्याचे कारण देत ही वस्ती पोलिसांकडून सील करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांचा इथे चालणाऱ्या बाबींना विरोध आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. तर ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. रविवारी आंदोलक आणि स्थानिक नागरिक आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. दोन्हीकडच्या लोकांना थांबविण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचेही चित्र यावेळी बघायला मिळाले.