नागपूर - दोन दिवसांपूर्वी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर अशोक पाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. डॉ. अशोक पाल यांच्या हत्येचे पडसाद नागपूरमध्ये देखील उमटले आहेत. आजपासून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी घर चलो अभियान सुरू केले आहे. या दोन्ही रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा -...जेव्हा गडकरी रक्तबंबाळ होतात; संघर्षकाळातील आठवणींना दिला उजाळा
डॉक्टर अशोक पाल यांच्या मारेकऱ्यांना जो पर्यंत अटक केली जाणार नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. यवतमाळच्या घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता मेडिकल मधील निवासी डॉक्टरांनी डीन कार्यालयासमोर प्रदर्शन केले. जो पर्यंत डॉक्टरांच्या सुरक्षेला सरकार गांभीर्याने घेणार नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील, असा आरोप आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आजपासून इंटर्न डॉक्टर लायब्ररीचा वापर करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यवतमाळ पोलिसांनी या घटनेचा तपास योग्य पद्धतीने करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.