नागपूर : नागपुरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासन आणि प्रशासनात समन्वय नसल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयात बेड मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आजच्या घडीला सर्वाधिक बेड असणाऱ्या रुग्णालयातच परिस्थिती गंभीर झाली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नसून शासन आणि प्रशासनात समन्वय नसल्याने हे होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या कोरोनासदृश लक्षणे असणारे बरेच रुग्ण हे प्राथमिक उपचारांसाठी येत आहेत. या सर्वांना कोरोनासदृश लक्षणे असल्याने अनेकांना ऑक्सिजन लावण्याचीही वेळ येत आहे. या सर्वांचे कोरोना निदान होण्यापूर्वी त्यांना आकस्मिक रुग्ण विभागात ठेवण्यात येते. रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून एका बेडवर दोन-दोन रुग्णांना ठेवले जात असल्याचा आरोप करत एक व्हिडिओ बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांना शेयर केला आहे.
नागपुरातील परिस्थितीला सरकार जबाबदार - चंद्रशेखर बावनुकळे नागपूरला सोडले वाऱ्यावर नागपुरातील तिन्ही मंत्री नितीन राऊत, अनिल देशमुख, सुनील केदार सध्या वाढत असणाऱ्या संक्रमणाच्या काळात नागपूरकडे लक्ष देत नाहीत. यांनी नागपूरला वाऱ्यावर सोडले असल्याने अशी गंभीर परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही त्यांनी केला. महिनाभरापूर्वीच यावर योग्य नियोजन करण्याची गरज होती असे ते म्हणाले.
कोणी प्रचार दौऱ्यात तर कोणी स्वतःची खुर्ची वाचविण्यात मग्न
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला गृहमंत्री आपली खुर्ची वाचविण्यात व्यस्त असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. शासन आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे नागपूरची स्थिती बिघडत चालल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
या गंभीर परिस्थितीला महाराष्ट्राचे सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री मुंबईकडे लक्ष देऊन आहेत. तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष आहे. नागपूरकडे कोणाचेच लक्ष नाही असेही ते म्हणाले. गंभीर परिस्थिती उद्भवणार याची जाणीव असताना याचे नियोजन महिन्याभरापूर्वी होणे अपेक्षित होते. पण दुर्लक्ष केल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका त्यांनी केली.