नागपूर - हिंगणा परिसरात नागपूर महानगर परिवहन सेवेच्या चालत्या स्टार बसमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. यावेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
नागपुरात शॉर्टसर्किटमुळे स्टार बस जळून राख; प्रवासी सुखरुप
हिंगणा येथून सीताबर्डी येथे जाण्याकरिता निघालेली नागपूर महानगर परिवहन सेवेची बस आज सकाळी शॉटसर्किटमुळे जळाली.
नागपूर महानगर परिवहन सेवेची बस आज सकाळी हिंगणा येथून सीताबर्डी येथे जाण्याकरिता निघाली. यावेळी बस मध्ये फारसे प्रवासी नव्हते. बस काही अंतरावर गेल्यानंतर बसच्या समोरील भागातून धूर निघताना दिसताच बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून बस मधील प्रवाशांना खाली उतरले. बस चालकाने स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, आग विझण्याऐवजी आणखीच भडकल्याने क्षणात संपूर्ण बस जळून राख झाली आहे.
बसला आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत ही बस जळून खाक झाली होती. सध्या नागपूरात ४७ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याने शहरात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या बसेसची अवस्था वाईट झाल्यामुळे आगीच्या घटनेला कारणीभूत ठरत आहेत.