नागपूर - रविवारी दिवसभरात नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ३४३ रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात तब्बल २ हजार ३४३ रुग्ण वाढल्याने नागपुरातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५२ हजार ४७१ इतकी झाली आहे. महत्वाचे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या १३ दिवसांमध्ये २२ हजार ८५६ रुग्णांची भर पडली आहे. तर ६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात आतापर्यंतची सर्वाधीक कोरोना रुग्णांची वाढ; 2 हजार ३४३ नवीन रुग्णांसह ४५ मृतांची नोंद - नागपूर ताज्या बातम्या
नागपुरात दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढत असून रविवारी आतापर्यंतच्या सर्वाधीक रुग्णांची नोंद झाली आहे.
रविवारी नागपुरात २ हजार ३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५२ हजार ४७१ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या २ हजार ३४३ रुग्णांपैकी २९६ रुग्ण नागपुर ग्रामीण भागातील आहेत. तर २ हजार ४२ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. तर आज १ हजार ७३९ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार १३९ इतकी झाली आहे. मात्र, रविवारी ४५ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १ हजार ६५८ इतका झाला आहे. दरम्यान, नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७४.६१ टक्के इतके आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रद्रोही भाजपाकडून आता मराठी कलाकारांचाही अपमान - सचिन सावंत