नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आज कोरोना रुग्णांची संख्या नव्वद हजार झालेली आहे. शहरातील प्रत्येक परिसर आणि प्रभागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र शहरातील एक परिसर असा आहे, ज्याला कोरोनाने संसर्ग केलेला नाही. सात महिन्यांनंतरही या वस्तीत कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही.
या परिसरात अनेक एड्सबाधित रुग्ण देखील वास्तव्यास आहेत. ते देखील कोरोना काळात सुरक्षित राहिले. हा परिसर वारांगणांची वस्ती म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो. त्याचं नाव आहे गंगा-जमुना!
महिला विशेष : नागपुरातील 'रेड लाइट एरिया' सात महिन्यांपासून 'कोरोना फ्री' स्थानिक पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने नागपुरच्या या 'रेड लाइट' भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास आळा बसला. गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राखी गेडाम यांनी सलग सात महिने या भागातील महिलांचे समुपदेशन केले. यामुळे हा परिसर कोरोनामुक्त राहिला. राखी गेडाम यांच्या मदतीला इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या स्वयंसेवक हेमलता यांनी देखील मोलाची साथ दिल्याने हे साध्य झाले. या वेश्यावस्तीने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलाय.
गंगा-जमुना ही वारांगणांची वस्ती नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. गेडाम यांची नेमणूक नागपुरातील सर्वात पहिल्या कंटेनमेंट झोन असलेल्या लकडगंज पोलीस ठाण्यात आहे. कोरोना हळूहळू हातपाय पसरत असताना पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी त्यांच्याकडे गंगा-जमुना सारख्या संवेदनशील भागाची जबाबदारी सोपवली. उजाडलेला प्रत्येक नवा दिवस नवी परीक्षा असल्याचे समजून त्यांनी वारांगणांच्या वस्तीत कामाला सुरुवात केली. पोलीस आले की पळून जाणाऱ्या वेश्यांशी संवाद साधणे कठीण होते. मात्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या हेमलता यांच्या मदतीने राखी गेडाम यांनी वारांगणांशी बातचीत सुरू केली.
हळूहळू त्या मिसळू लागल्या होत्या. त्याच वेळी कोरोनामुळे काय घडू शकतं, याची कल्पना वारांगणांना दिली. देह व्यवसायाशिवाय कोणतही काम देणार नाही. दुसरं काम देखील आपल्याला जमत नाही. मग जगायचं कसं, हा प्रश्न वेश्यांसमोर होता. सामाजिक संस्थांच्या मदतीने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निकाली काढला. तर अनेक संस्थानी औषधांचा पुरवठा केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राखी गेडाम यांनी सलग सात महिने या भागातील महिलांचे समुपदेशन केले. सध्या गंगा-जमुना वस्तीत शेकडो वारांगणांसह जवळपास 1600 लोक राहतात. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. या ठिकाणी काही एड्सबाधित रुग्ण देखील आहेत. त्यांच्या मदतीसाठी राखी गेडाम आणि हेमलता यांनी नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबवल्या. यामुळे या भागात एकही रुग्ण आढळला नाही. आज सात महिन्यांनंतर हा व्यवसाय पुन्हा सुरू होत आहे. मात्र शासनाने घालून दिलेला प्रत्येक नियम या ठिकाणी तंतोतंत पाळला जातो. या महिला वेश्या व्यवसायापासून दूर व्हाव्यात आणि इतर काम धंदा करून सन्मानाचे जीवन जगावे, यासाठी राखी गेडाम आणि हेमलता प्रयत्न करत आहेत.