महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राणीच्या पोटी जन्मलेली आदिशक्ती! जाणून घ्या कोराडीच्या जगदंबेबद्दल...

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, हे नागपूरच्या उत्तरेस जवळपास 15 कि.मी. अंतरावर आहे. कोराडी देवी मंदिर परिसराचे अगोदरच्या काळी 'जाखापूर' हे नाव होते. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. त्यावरून मंदिराची प्राचीनता लक्षात येते. नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष सिरीजमध्ये जाणून घ्या कोराडीच्या आदिशक्तीबद्दल...

koradi goddess temple
राणीच्या पोटी जन्मलेली आदिशक्ती! जाणून घ्या कोराडीच्या जगदंबेबद्दल..

By

Published : Oct 24, 2020, 10:43 AM IST

Updated : Oct 24, 2020, 1:12 PM IST

नागपूर - पूर्वी कोराडी हे जाखापूर या नावाने ओळखले जात असे. जाखापूरचा राजा झोलन याला सात पुत्र होते. जनोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर! परंतु एकही कन्यारत्न नसल्याने राजा दु:खी होता. त्याने यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करून देवाना प्रसन्न केले; आणि एक कन्यारत्न मागितले. दिव्य, पवित्र व तेजोमय रुपगुणसंम्पन्न कन्येच्या रुपाने अवतरलेल्या आदिमायेच्या अनेक दिव्य अनुभूती राजाला येत असत. तिने राजाला अनेक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करून योग्य निर्णयाप्रत पोहचवले. एका युद्ध प्रसंगी तिने राजाच्या शत्रुविषयी देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडवले. राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन:प्रत्यय आला. अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली, ते ठिकाण म्हणजे जाखापूर...साक्षात शक्तीपीठ!

राणीच्या पोटी जन्मलेली आदिशक्ती! जाणून घ्या कोराडीच्या जगदंबेबद्दल..

नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष सिरीजमध्ये जाणून घ्या कोराडीच्या आदिशक्तीबद्दल..

हेमाडपंथी बांधकाम

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, हे नागपूरच्या उत्तरेस जवळपास 15 कि.मी. अंतरावर आहे. कोराडी देवी मंदिर परिसराचे अगोदरच्या काळी 'जाखापूर' हे नाव होते. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. त्यावरून मंदिराची प्राचीनता लक्षात येते. हिंदू जीवनाचे आधारस्तंभ धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थात देवीच्या दर्शनाने यश मिळते. अशी भक्तांची श्रद्धा आहे.

झोलन राजा आणि जकुमाबाईची अख्यायिका

झोलन राजाच्या पत्नीला म्हणजेच राणी गंगासागर यांना कन्यारत्न झाले. कन्येचा जन्म होताच नगरातील प्रजा खूप आनंदात झाली. जिकडे तिकडे उत्सव साजरे केले जात होते. राजकन्येला बघण्यासाठी आल्यानंतर आईची स्वर्णीम कांती, उज्ज्वल तेज, सौम्य हास्य, अत्यंत आकर्षक मुखमंडळ, तेजस्वी डोळे, आकर्षक कान, भव्य मस्तक असे कन्येचे रुप पाहून राजाचे नेत्र दिपत होते. राजाला असे वाटले की कन्या नसून दिव्य शक्ती आपल्या घरी मुलीच्या रुपाने अवतरली आहे. नंतर शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे आई जाकुमाई वाढू लागली. त्यांचे सर्वतोमुखी दिव्य तेज आणि सुंदरता याची राजवाड्यात चर्चा होऊ लागली.

अप्रतिम सौंदर्य आणि लग्नाची मागणी

झोलन राजाच्या नगराच्या सीमेपलीकडील भागामध्ये किराड राजाची नगरी होती. किराड राजाची कन्या जंगलात फिरत फिरत मैत्रिणी सोबत आणि काही निवडक सैन्यासोबत झोलन राज्याच्या नगरात प्रवेश केला. राजाच्या सैनिकांनी अनोळखी व्यक्ती आपल्या सीमेत आलेली पाहून राजासमोर आणले. तेव्हा झोलन राजाची कन्याजाकुमाई राजदरबारात उपस्थित होती. झोलन राजाने सर्व विचारपूस केल्यानंतर सन्मानाने त्याच्या नगरीत पाठवून दिले. तेव्हा किराड राजाच्या कन्येने झोलन राजाची मुलगी, तिचे अप्रतिम सौंदर्य आपल्या वडिलांना सांगितले. किराडच्या राजाने झोलन राजाच्या मुलीला आपल्या मुलांसाठी मागण्याचा मनात विचार केला. त्याबाबत राजाने दुतामार्फत संदेश पाठवला.

जकुमाऊने दुताला सांगितले आम्ही युद्धास तयार

मात्र झोलन राजाने हा प्रस्ताव नाकारला. नंतर किराड राजाला संताप आला व रागाच्या भरात त्याने झोलन राजाला दूत पाठवून युद्धासाठी तयार होण्याचे सांगितले. अन्यथा मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणला. प्रस्ताव ऐकल्यानंतर राज्यसभेत जकुमाईने दुताला सांगितले की आम्ही युद्धासाठी तयार आहोत. असे म्हणताच त्या क्षणी झोलन राजा जाकुमाईकडे पाहतच राहिले. झोलन राजाला हे माहिती होते, की ही दैवशक्ती आहे. त्यामुळे राजाला जाकुमाईच्या प्रस्थावाला दुजोरा दिला.

युद्धाला सुरुवात

ठरल्याप्रमाणे युद्धाचा दिवस निश्चित झाला. झोलन राजाची सेना सर्व अस्त्रशस्त्रानिशी हत्ती, घोडे, रथ, पालखी, व सर्व सेना सुसज्ज करून सेनापती राजवाड्यासमोर उपस्थित होती. जाकुमाईने झोलन राजाचे दर्शन घेऊन आई गंगासागर यांचे सुद्धा आशीर्वाद घेऊन वडिलांची आज्ञा घेऊन निघाली. आई जाकुमाई स्वतः हत्तीवर बसून हातामध्ये त्रिशूल, डमरू, तलवार, धनुष्य आदी शस्त्रे घेऊन हत्तीवर स्वार होती व तिने रणभूमीकडे कूच केले. आई जाकुमाई समोर व त्याची सर्व सेना होती.

किराड राजाला दिले जीवनदान

दोन्ही सेना समोरासमोर धडकल्या. भयंकर युद्ध झाले. शेवटी किराड राजाचा पराभव झाला. राजाआईच्या चरणी लोटांगण घालीत होता. दयेची भीक मागत होता. आईनी किराड राजाला जीवनदान दिले. पण आई जाकुमाई दैवीशक्ती असल्यामुळे झोलन राजाच्या दरबारात परत गेली नाही. ज्या कामासाठी अवतार घेतला होता, त्या किराड राजाच्या दुष्ट सेनापतीच्या व राजाला शिक्षा दिल्यानंतर आई ज्या ठिकाणी सूर्य अस्त होईल, त्या ठिकाणी मी थांबेल, असे म्हणून सर्व सेना व सेनापती यांना झोलन राजाच्या दरबारात परत पाठवले. नंतर आई रस्त्याने निघाल्या. सूर्य मावळल्यानंतर ज्या ठिकाणी त्या विराजमान झाल्या ते ठिकाण म्हणजे 'जाखापूर'...

या जत्रेची अशी आहे परंपरा

जाखापूरमध्ये चैत्र व अश्विन महिन्यात वर्षातून दोनदा जत्रा भरते. आताही आईची तीन रुपं साक्षात दररोज भक्तांना दर्शन देत असतात. वर्षातून आईचे विशेष दर्शन ज्या स्वयंभू साक्षात स्वरुपात आहे, ते दर्शन चैत्र महिन्यात होते. तसेच अश्विन प्रपिपदेच्या दिवशी या स्वयंभू मूर्तीचे दर्शन भक्तांना होत असते. यावेळी अफाट गर्दी असते. देवीच्या पूजेचा मान वंशपरंपरेनुसार फुलझले परिवाराकडे आहे.

विहिरीतही बांधकाम

जाखापूर परिसरात अभ्रक व रांगोळीचे दगड आजही मिळतात. तिथे पुरातन काळापासून जाखापूर या ठिकाणी सिद्ध पुरुष साधना करत असत. नंतर गोंड राजे यांची कारर्कीद आली. त्यानंतर भोसले राजे यांची कारर्कीद अस्तित्वात होती. त्याही अगोदर मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम दगडाची दत्री, लाकडाचे कोरीव काम, दीपमाळ, मोठमोठ्या शिलेवर मंदिराचे बांधकाम अगोदर झालेले होते. नंतर भोसले कालीन साम्राज्य आले, तेव्हा हे मंदिर सुप्रसिद्ध भोसले घराण्याअंतर्गत पुरी परिवार मालगुजारीच्या अधिकारात हे क्षेत्र येत होते. जाखापूर या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये भक्त लोकांसाठी भक्तांच्या सेवेसाठी सराईचे बांधकाम, विहिरीचे बांधकाम केलेले आढळते.

Last Updated : Oct 24, 2020, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details