नागपूर - शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात नागपुरातून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा जोरात सुरु असतानाच उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही अनपेक्षितपणे शपथविधी झाला. त्यामुळे आता कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल आणि कुणाकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल, या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारला विश्वासमाताची परीक्षा पास करायची आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमदार मुंबईमध्ये ठाण मांडून बसले असून ते मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी लॉबिंग करत आहेत.
कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्री पदाची माळ -राज्यात महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार शिवसेनेतील बंडखोरीमुळे कोसळले. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्यात नवे सरकारचे गठन होत असताना नवे मंत्रिमंडळ कशाप्रकारचे असेल याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. नागपुरातून मंत्री आणि नंतर पालकमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशी अपेक्षा असल्याने सुरवातीला नागपुरातील भाजप समर्थकांचे पालकमंत्री पदासाठी आपापले दावे होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्यानंतर पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे प्रबळ दावेदार -भारतीय जनता पक्षाचा नागपुरातील आक्रमक चेहरा म्हणून माजी ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ओळख आहे. ते विधान परिषद सदस्य आहेत. भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून देखील बावनकुळे यांच्याकडे बघितले जाते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी दोन्ही नेत्यांच्या गुडबुकमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी यापूर्वी पालकमंत्री म्हणून उत्तम कारभार केला आहे. प्रशासनावर त्यांची चांगली पकड असल्याने ते मंत्रीपदासह पालकमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे दिसत आहे.
कृष्णा खोपडेची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का -कृष्णा खोपडे यांचे नाव देखील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्याच्या भाऊगर्दीत घेतले जात आहे. कृष्णा खोपडे हे भारतीय जनता पक्षाचे सर्वमान्य नेते आहेत. ते पूर्व नागपूर मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गेल्या वेळी मंत्रिपद हुकल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावेळी मंत्रिपद नक्की मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. कृष्णा खोपडे हे गडकरींच्या अत्यंत जवळचे मानले जातात.