नागपूर- नागपुरात रुग्णसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली होती. यात ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी ओडिशातील अंगुलच्या स्टील प्लॅन्टमधून ऑक्सिजन मागवण्यात आले. हेच ऑक्सिजन घेऊन, दुसरी खेप ग्रीन कॉरिडोरच्या साह्याने पहाटे अडीच वाजेच्या सुमारास 4 टँकर नागपुरात पोहचले आहेत. यापैकी तीन ऑक्सिजन टँकर शनिवारी आले होते.
ऑक्सिजनची दुसरी खेप रेल्वेने नागपुरात दाखल
नागपूरच्या मध्य रेल्वे स्थानकावर सुमारे 63 टन ऑक्सिजन साठा असलेले 4 टँकर रेल्वेच्या मदतीने अंगुल मधून नागपूरला आणण्यात आले. नागपूरला छत्तीसगडमधील भिलाईमधून मिळणारा ऑक्सिजनचा साठा कमी झाल्यानंतर प्रशासनाने नागपुरातील ऑक्सिजन टॅंकर विमानाने ओडिशामधील भुवनेश्वरला पाठविण्याचा निर्णय घेतला. यात गुरुवारी रिकामे टँकर विमानाच्या मदतीने भुवनेश्वरला पाठविण्यात आले. भुवनेश्वरपासून 130 किलोमीटर अंतरावरील अंगुलच्या स्टील प्लॅन्टमधून ऑक्सीजन भरलेले हे टँकर रेल्वेने परत नागपुरात आणण्यात आले आहेत. यात अंगुलमधून ऑक्सिजनची ही दुसरी खेप आज पहाटे रेल्वेने नागपुरात दाखल झाली आहे.