नागपूर - नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवा कॉलनीत क्षुल्लक करणातून उद्भलेल्या वादामुळे गुंडांच्या टोळक्याने गोळीबार केला. या थरारात सुदैवाने नेम चुकला आणि तरुणांचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. क्राईम कॅपिटल म्हणून ओळख असणाऱ्या शहरात इतक्या सहज क्षुल्लक भांडणात बंदुकीचा उपयोग केला जात असेल तर गुन्हेगाऱ्यांच्या हिंमती किती वाढल्या हे समोर येत आहे. पण पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या टोळक्यातील 6 जणांना अटक केली आहे.
क्षुल्लक वादातून केलं कृत्य; सहा जणांना अटक गोवा कॉलनी परिसरात चाट सेंटर चालवणारे काही युवक त्याच परिसरात एका बाकड्यावर बसून होते. तेवढ्यात त्याठिकाणी दारूच्या नशेत दोघेजण आले. यावेळी दारूच्या नशेत एकजण नाहक बडबड करत होता. यावेळी बसून असलेल्या तरुणाने उगाचच बडबड नको करू म्हणत हटकले. पण ऐकत नसल्याने तरुणांचा राग अनावर झाला अन् त्या मद्यापीच्या कानशिलात दोन हाणल्या आणि वादाची ठिणगी पडली.
कानशिलात बसताच धमकी देत निघून गेला...
यानंतर मात्र दारूच्या नशेत धमकी देत 'रुक यहीपे दिखाता हू' असे म्हणत निघून गेला. या युवकांनी दारूच्या नशेत असल्याने त्या मद्यापीच्या बोलण्याला गांभीर्याने घेतले नाही. पण जवळपास दोन तासानंतर दुचाकीवर सहा जण बंदूक घेऊन परतले. यावेळी त्यानी 'कहा है वो' म्हणत त्या युवकांच्या दिशेने पिस्तुलचे राउंड फायर केले. यावेळी गोळ्यांचा आवाजाने स्थानिक लोकांची गर्दी झाली. ही गर्दी पाहुन मात्र या गुंड टोळक्याने पळ काढून निघून गेले. गोळ्यांच्या राउंड फायरने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती सदर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी भेट देत पोलीस पथकाना या टोळीचा शोध घेण्यास रवाना केले.
बंदुकीने चार राउंड फायर केले...
अवघ्या काही तासात या टोळक्यातील सहा जणांना अटक करत फिर्यादी युवकांच्या तक्रातीवरून उशीरा रात्री गुन्हा दाखल झाला. यात आरोपींचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या अटक सहा जणांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी दिली. या घटनेने मात्र परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.