नागपूर - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील अनेक पुरावे वकील सतिश उके यांनी गोळा केले होते. याची माहिती त्यांनाही समजली होती. त्यामुळेच आज ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप सतिश उके यांचे धाकटे बंधू शेखर यांनी केला आहे. ईडीच्या कारवाईनंतर ते मीडिया सोबत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सर्व पुरावे लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये असल्याने केवळ लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सर्व माहिती फोन आणि लॅपटॉपमध्ये - वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एकाचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागणार आहे. भविष्यात देखील अनेक प्रकरणे बाहेर काढण्याची ते तयारी करत होते. म्हणूनच सतीश उके यांच्यावर ईडी कडून कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शेखर उके यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील अनेक याचिकेतील पुरावे सतीश उके यांच्या लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये असल्याने ईडीने लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला असल्याचे ते म्हणाले.