मुंबई - कॉर्डिलिया क्रुजवर एनसीबीने (अमली पदार्थविरोधी पथकाने) केलेल्या कारवाईवर अनेक आरोप - प्रत्यारोप करण्यात आले आहेत. या कारवाईत एनसीबीकडून पंचनाम्यासाठी वापरण्यात आलेले पंचही फुटले. हे पाहता पंच निवडताना एनसीबीकडून हलगर्जीपणा झाला का? असा प्रश्न उद्भवतो. मग पंच नेमका कसा असावा? या प्रश्नाचे उत्तर ईटीव्ही भारतने ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांच्याकडून जाणून घेतले. तसेच, सातपुते यांनी या प्रकरणातील पंचांमुळे न्यायालयात केसवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत मत व्यक्त केले.
पंचांच्या विश्वासार्हतेवर शंका का?
कारवाईत आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यासह वीस जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. क्रुजवर केलेल्या कारवाईनंतर जो पंचनामा एनसीबीकडून करण्यात आला. त्या पंचनाम्यासाठी किरण गोसावी, मनीष भानुषाली आणि प्रभाकर साईल हे पंच होते. मात्र, आता या पंचांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात मुख्य पंच असलेला प्रभाकर साईल यांनी या प्रकरणात पंच म्हणून आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या, तसेच आर्यन खान याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये द्यायचे ठरले होते, असा आरोप केला आहे.
प्रकरणात असणारा दुसरा पंच के.पी. गोसावी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पंच आहे. पुणे पोलिसांकडे के.पी. गोसावी यांच्या विरोधात तक्रारी दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, या पंचांच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात असलेला तिसरा पंच मनिष भानुषाली आणि के.पी. गोसावी यांनी क्रुजवरील धाडीनंतर सर्व आरोपींना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यासाठी केलेल्या कारवाईमध्ये भाग घेतला असल्याने हे पंच जाणून बुजून तयार केले गेले आहेत का? याबाबत देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.