नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय. त्यांच्या निवासस्थानी एसआरपीएफचे सशस्त्र जवान, शहर पोलीस दलाचे जवान आणि खाजगी सुरक्षा रक्षक असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अँटिलिया, मनसुख हिरेन आणि आता परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच फडणवीस यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे हे विशेष.
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविली घराबाहेर कडक बंदोबस्त
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाची सुरक्षा अचानकच वाढविण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. विविध मुद्यांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा वाढविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एरवी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर मोजक्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात असायचा. मात्र, सोमवारी एसआरपीएफचे सशस्त्र जवान, शहर पोलीस दलाचे जवान, क्विक रिस्पॉन्स टीमच्या जवनांसह खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.
आंदोलनाच्या शक्यतेमुळे सुरक्षेत वाढ?
दोन दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप लावला होता. देशमुखांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझेंना दिल्याचा आरोप या पत्रातून त्यांनी केला होता. यावरून राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरासमोर जोरदार आंदोलन केले. त्याच्या प्रत्युत्तरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सध्या देवेंद्र फडणवीस यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांची ही सुरक्षा कायम होती. मात्र जानेवारी महिन्यात राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेत कपात करत फडणवीस यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविली. मात्र आज अचानक त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याने आता त्यांची वैयक्तिक सुरक्षाही वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी