नागपूर -जमावबंदीचा आदेश धुडकावून भारतीय जनता पक्षाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. केशरी रेशनकार्ड धारकांना धान्याचा पुरवठा बंद केल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाचे संयोजक मुन्ना यादव हे होते. अमरावती येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू केलेली आहे. त्यानुसार पाच पेक्षा अधिक नागरिकांना एका ठिकाणी गोळा होण्यावर बंदी असताना देखील मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते, त्यामुळे पोलीस विभागाकडून मोर्चा आयोजकांवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने गोर-गरिबांना पुरेल इतका धान्यसाठा राज्याला केला आहे. मात्र तरी देखील राज्य सरकारने केसरी रेशनकार्ड धारकांना रेशनच्या धान्याचा पुरवठा बंद केला आहे. हा मुद्दा धरून भारतीय जनता पक्षाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूरत हाय अलर्ट.. कलम 144 लागू
त्रिपुराच्या कथित घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे. उपराजधानी नागपुरातही रविवार रात्रीपासून कलम 144 लागू करत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सोशल माध्यमांवर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नयेत असेही आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली.
संवेदनशील भागावर पोलिसांची नजर -
नागपूर शहरांमध्ये कुठल्याही पद्धतीने सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून जातीय तेढ किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या पोस्ट करू नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे. यात शहरातील विविध असे 32 संवेदनशील भाग आहे. त्या-त्या भागात पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील गुंड प्रवृत्तीचे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांवर पोलीस विभाग कडक नजर ठेवून आहे. यासोबतच धार्मिक समुदायांचे धर्मगुरू यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांच्याशी चर्चा करून शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
समाज माध्यमांवर अफवा पसरू नये -
सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमांवर कुठलेही अफवा किंवा चुकीच्या पोस्ट टाकू नये जर असे काही प्रकार आढळून आल्यास त्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पोलीस विभाग सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन तयारीत आहे. आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी पोलिस विभागही सज्ज असल्याचेही नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.
जमावाला बंदी -
शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर मोर्चा किंवा राजकीय मोर्चे काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. विनापरवानगी कोणी मोर्चा काढत असेल तर त्यावर पोलीस विभाग कारवाई करेल. तसेच शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यात आम्हाला विश्वास आहे नागपूरकर पोलिसांना सहकार्य करत शांतता सुव्यवस्था कायम ठेवेल. यात जातीय विषयांना धरून किंवा हिंदू मुस्लिम भावना भडकतील अशा पद्धतीचे मोर्चे काढण्यास मनाई असणार आहे. तसेच पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असल्याचेही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.