नागपूर -राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच अनुषगांने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्ह्यात तयारी करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय कोरोनामुळे विशेष खबरदारी घेत शाळा सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शाळेबाबत पालकांची संमतीही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे माहिती देताना सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांना सुरूवात -
गेली ७-८ महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा कोरोना नियमांचे पालन करत सुरू करण्यात येणार आहेत. यात ९ ते १२ वी पर्यंतच्या वर्गाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही शाळा सुरू करण्यासाठी तयारीला सुरूवात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे. यात खबरदारी म्हणून सर्व शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती नाही -
विशेष म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे म्हणून कोणतीही सक्ती करण्यात येणार नसल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे कोरोनाचे संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक बाबींकडेही विशेष लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पालक व शिक्षक संघासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतले जाणार आहे. शिवाय जिल्ह्यात ११ हजार ५०० इतके शिक्षक ९ ते १२ वी ला शिकवीतात. यात खाजगी आणि शासकीय शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचणी व आरोग्य विषयक काळजी घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबच्या सर्व तयारी प्रशासनाकडून केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.