नागपूर - नागपुरातील संकल्प गुप्ता ज्याचा वयाच्या चौथ्या वर्षी सुरू झालेला ग्रँडमास्टर होण्याचा प्रवास वयाच्या अठराव्या वर्षी पूर्ण झाला आहे. नुकत्याच सर्बिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आहे. तो उपराजधानी नागपुरातील दुसरा तर विदर्भातील तिसरा असून देशाच्या रँकिंगमध्ये 71 वा ग्रॅण्डमास्टर झाला आहे. पण त्याचा हा प्रवास कसा सुरू झाला हे जाणून घेऊया या विशेष वृत्तातून...
नागपुरातील व्यापारी कुटुंबातील संकल्प याने वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धीबळ खेळायला सुरूवात केली. यात यंदा सर्बियात 24 दिवस चाललेल्या तीन जीएम नॉर्म पूर्ण करत त्याने 2 हजार 504 च्या वर येलो रेटिंग मिळवले आहे. त्याने या स्पर्धेत 6.5 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पुढेही खेळत राहण्याचा संकल्पचा 'संकल्प' आहेच. पण हे यश मिळवताना त्यानेही कठोर परिश्रम घेतले आहे. अवघ्या 4 वर्षाचा असताना संयुक्त कुटुंबात मोठे भाऊ-बहीण बुद्धीबळ खेळतांना पाहत होता. त्यांना पाहता पाहता संकल्पनेही खेळायला सुरुवात केली. बुद्धीबळ शिकवायला घरीच शिक्षक येऊन लागले. तो ही जिद्दीने मन एकाग्र करत खेळत गेला. हळूहळु बुद्धीबळ स्पर्धेत सहभाग घेत कटशाह डाव खेळत स्पर्धेत येलो रेटिंग मिळवत गेला.
नवीन संकल्प सुपर ग्रँडमास्टर होण्याचा -
स्पर्धा म्हटली की यश-अपयश आलेच. या सगळ्यात काही ठिकाणी दुसरा तर काही काही स्पर्धेत तिसरा तर कुठे अपयशही आले. अनेकदा तो हरला की रडत बसायचा पण अनुभवातून समृद्ध होत गेला. हरवून थांबण्यापेक्षा त्याने अधिक जिद्दीने स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरले. तो अधिक वेळ चेस खेळत राहत होता. यासाठी रोज सराव आणि सातत्य जपले आणि पुढे ग्रँडमास्टर होण्यासाठी खेळत गेला. ते स्वप्न आता त्याचे पूर्ण झाले आहे. पण सुपर ग्रँडमास्टर होण्याचा 'संकल्प' मनाशी बाळगून तो खेळत आहे. लवकरच स्पेनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो जाणार असल्याचेही त्याने सांगितले.