नागपूर -संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते झाले आहेत. शिवसेनेचे खासदार किंवा सेनेचे प्रवक्ते राहिलेले नाहीत, अशा पद्धतीने ते वक्तव्य करत असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेसविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे व आमच्या नेत्याबाबत कुठल्याही व्यक्तीने बोलणे आम्हाला मान्य नसल्याचे सांगणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ते नागपूर विमानळावर माध्यमांशी बोलत होते.
पटोले म्हणाले, की आमची सुरवातीपासून भूमिका आहे की, मोठ्या अधिकाऱ्याने पक्षाला बांधील होऊन कटपुतली बनू नये. अधिकाऱ्यांना मिळालेल्या पदाचा फायदा सामान्य जनतेला मिळावा, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण मागील काही काळापासून वरिष्ठ अधिकारी राजकीय पक्षाला समर्पित झाल्याप्रमाणे वागत आहेत, ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे रश्मी शुक्ला प्रकरणात बोलताना पटोले म्हणाले. ते म्हणाले की, प्रशासनासाठी हे घातक आहे. जे काही रश्मी शुक्ला प्रकरणात समोर आले आहे त्यात चौकशी सुरू झाली आहे.