नागपूर - कोवीड-19 या विषाणूमुळे पसरणाऱ्या कोरोना या साथीच्या रोगावर प्रभुत्व मिळवण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. सॅनिटायझरच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दारूच्या बंद कारखान्यात सॅनिटायझरची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सॅनिटायझर तयार करण्यासाठी परवानगी दिली आहे.
सॅनिटायझरच्या तुटवड्यावर तोडगा; दारूच्या बंद कारखान्यात सॅनिटायझरच्या निर्मितीला सुरुवात - सॅनिटायझर निर्मिती
सॅनिटायझरच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दारूच्या बंद कारखान्यात सॅनिटायझरची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला शासनाने मान्यता दिली आहे. सध्या बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा आहे.
![सॅनिटायझरच्या तुटवड्यावर तोडगा; दारूच्या बंद कारखान्यात सॅनिटायझरच्या निर्मितीला सुरुवात Sanitizer Manufacturing](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6607383-thumbnail-3x2-aa.jpg)
सध्या बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा आहे, त्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार सॅनिटायझर बनवून पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मागील महिनाभरापासून नागपूरसह देशात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी सॅनिटायझरचा काळाबाजार करायला सुरुवात केल्याने 50 ते 60 रुपयाला मिळणारी बाटली आता 300 रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रोटेक्टिव्ह मास्कप्रमाणे सॅनिटायझर सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. हीच परिस्थिती लक्षात घेता शासनाने स्थानिक पातळीवर सॅनिटायझर तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.