नागपूर -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आज याच अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि महापौर संदीप जोशी यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा झाली, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. कोरोना संकटाचा सामना महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या साथीने एकत्रितपणे करण्यात येणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे यांच्याविरोधात महापालिकेने कारवाई सुरु केलेली आहे. पोलीस विभागदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करणार आहे. येत्या काळात जनता कर्फ्यू लावायचा का, कोणत्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करायची. कोरोना रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येईल, याची चर्चा बैठकीत झाल्याचे संदीप जोशींनी सांगितले.