नागपूर - कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनची ( Corona New Variant Omicron ) धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. भारतात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने ( Nagpur District Administration ) खबरदारीचा म्हणून उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा ( Divisional Commissioner Prajakta Lavangare-Verma ) आणि जिल्हाधिकारी आर. विमला ( Collector R. Vimala ) यांनी मेयो, मेडिकल, एम्समधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची पाहणी ( Inspection of Oxygen Generation Projects ) केली. ओमायक्रॉनचा प्रसार वेगात होत असल्याने ऑक्सिजन प्रकल्पांचे काम आणि आवश्यक सुविधा 10 दिवसांत पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत.
कोविडच्या ओमिक्रॉन (Omicron ) या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Medical ), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय ( Meyo) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( All India Institute of Medical Sciences Nagpur ) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले आहेत. मेडिकलमध्ये दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यात आले असून यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा दहा डिसेंबरपूर्वी करावा. ऑक्सिजन निर्मिती प्लांट पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला दिनांक 16 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाने आवश्यक बांधकाम व विद्युत जोडणी पूर्ण करावी. ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यवाही करावी. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेडिकल अभियंत्याच्या सेवा घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
एम्स मध्ये चार ऑक्सिजन प्लांट -
‘एम्स’मध्ये बसविण्यात आलेल्या चार ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासंदर्भात ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासोबत चर्चा केली. मेयो, मेडिकल तसेच एम्समध्ये ऑक्सिजन पुरवठा ( Oxygen Supply )सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्धारित कालमर्यादेत सर्व ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी केल्या.