नागपूर - राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी लागल्याने काँग्रेसला एक आक्रमक आणि धडाडीचा चेहरा मिळाला आहे. त्यामुळे पक्षामध्ये उर्जितावस्था निर्माण होईल. मात्र, या निवडीनंतर राज्य सरकारमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चांना उधान आले आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांनी दिल्लीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली त्यानंतर नितीन राऊत यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसचे नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री पद-
सध्या महाविकास आघाडीतील मंत्रिपदाचा कोठा पूर्ण झालेला आहे. तर दुसरीकडे पटोले यांना उर्जा खाते देण्याची चर्चा रंगू लागली आहे, अशा परिस्थितीत नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री करायचे झाल्यास त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. तसेच सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे, असे असताना राष्ट्रवादी या पदावरचा दावा सोडणे अशक्यच आहे. तसेच ते दुसरा उपमुख्यमंत्री नक्कीच होऊ देणार नाहीत. किंबहुना त्यांची नाराजी ओढवून घेणे हे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्यास कारणीभूत ठरेल.
एका पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री होणार का? राऊतांना कोणते मंत्रालय?
बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार उपमुख्यमंत्री पद मिळावे, यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राज्यात आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर एका पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात येतील. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंत्रिमंडळात येण्यास उत्सुक आहेत. पटोले यांना मंत्री करायचे झाल्यास काँग्रेसच्याच एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा दिलेला मंत्री नाराज होऊ नये म्हणून त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा पर्याय काँग्रेसकडे खुला आहे. यात उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची नावे आघाडीवरती आहेत. मात्र, हे दोन्ही मंत्री अध्यक्षपद कितपत स्वीकारतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.