ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही तर महाविकास आघाडीची - डॉ. नितीन राऊत
यापुढे थकीत बीज बिल धारक शेतकऱ्यांची वीज कापल्याशिवाय पर्याय नसल्याचे पत्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहे. पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती ऊर्जामंत्री राऊत यांनी दिली आहे.
नागपूर -यापुढे थकीत बीज बिल धारक शेतकऱ्यांची वीज कापल्याशिवाय पर्याय नसल्याचे पत्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहे. पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती ऊर्जामंत्री राऊत यांनी दिली आहे. उद्या ज्यावेळी वीज कापायला सुरुवात होईल तेव्हा ऊर्जा मंत्रालय काँग्रेसकडे आहे, म्हणून काँग्रेसवर टीका होण्याची शक्यता आहे, मात्र ही जबाबदारी सामूहिक असल्याने महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा, असं देखील नितीन राऊत म्हणाले आहेत.
राज्याचे ऊर्जा मंत्रालय माझ्याकडे आहे. वीज तोडणीच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधीतरी खटके उडत असतात. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांना असावी, या उद्देशाने हे पत्र दिल्याचे नितीन राऊत म्हणाले आहेत. एवढेच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना देखील पत्राच्या माध्यमातून परिस्थिती कळवली असल्यायाचे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोळशाचा तुटवडा आहे, निधी सुद्धा उपलब्ध नाही. वीज ही सर्वसामान्यांची पहिली गरज आहे, त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाला निधी मिळणे गरजेचे आहे, नगर विकास मंत्रालयाकडून निधी मिळाला नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कैफियत मांडावी लागल्याचे नितीन राऊत म्हणाले.