नागपूर- महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन हटवण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत या योजनेचे मुख्य संचालक प्रवीण परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या सीईओची नियुक्ती होईल, तो पर्यंत उपकार्यकारी अधिकारी महेश मोरोने या प्रकल्पाचे काम बघणार आहेत.
तुकाराम मुंढे नागपूर महानगर स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सीईओ नसताना देखील त्यांनी सीईओ पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानंतर त्यांनी खासगी कंत्राटदारांना फायदा होईल, असे निर्णय घेतल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला होता. त्यावरून आज मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन हटवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर संदीप जोशी असा वाद रंगला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात बेकायदेशीर कारभार केल्याचा आरोप करत महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार देखील केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.