नागपूर -जुलै 2021 मध्ये नागपुरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरासह शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने रेकीकेली ( reiki of hedgewar smriti bhavan ) होती. अशी खळबळजनक माहिती यावर्षी जानेवारी महिन्यात समोर आली होती. केंद्रीय तपास यंत्रणांकडून नागपूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती. रईस अहमद असादउल्ला नामक दहशतवाद्याला काश्मीर पोलिसांकडून ( Terrorist Raees Ahmed Asadullah Sheikh ) अटक करण्यात आल्यानंतर त्याने नागपूरला दोन दिवस मुक्काम करून आरएसएससह अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा खुलासा केला होता, तेव्हा पासून नागपूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक त्याचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
नागपूरला रेकी करण्यासाठी आला रईस - 28 वर्षीय रईस अहमद असादउल्ला शेख हा अवंतीपुरा येथील निवासी आहे. तो जुलै 2021 मध्ये तब्बल दोन दिवस नागपूराला मुक्कामी थांबला होता. दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यात त्याने रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी केली होती. पाकव्याप्त काश्मीरातील कमांडर ओमर यांच्या आदेशाने रईस अहमद असादउल्ला शेख नागपूरला रेकी करण्यासाठी आला होता याचा खुलासा झाला आहे. मात्र, नागपूरला आल्यानंतर थेट आरएसएसची रेकी करणे सहज शक्य नाही, त्यामुळे त्याला या कामात कुणी-कुणी मदत केली होती, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न एटीएस कडून सुरू आहेत.