नागपूर - शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच 12 हजारहून दर पाडण्याचे काम सरकारच्या धोरणाने केले. तीच परिस्थिती कपाशीच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळे, सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आजपासून उपराजधानी नागपुरात पोलिसांनी परवानगी नाकारली असताना संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन (Ravikant Tupkar hunger strike) सुरू केले आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अन्नाच्या कणाला शिवणार नाही, अशी आक्रमक भूमिका तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतली आहे.
हेही वाचा -विदर्भ आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला; शिलेदार राम नेवले यांचे निधन
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन हे काळे पडले आहे. यातच कापूसही पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच सरकारकडून नाममात्र मदत देण्यात आली. दुसरीकडे सोयाबीनचे दर बाजारात 11 हजारावर पोहोचले असताना सोयाबीनच्या पेंड्या आयात करून सोयाबीन दर पाडले. आज चांगले सोयाबीन बाजारात चार हजराच्या घरात विकले जात आहे. काळ्या पडलेल्या सोयाबीनचे भाव त्यापेक्षा खाली गेले आहे. त्यामुळेच सरकारने सोयाबीनचे दर हे 8 हजार आणि कपाशीचे दर 12 हजार स्थिर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान करून बड्या घराण्यात फायदा पोहोचवण्याचा अजेंडा
पोल्ट्रीवाल्याच्या नावाने सोयाबीन पेंड आयात करून भाव पाडले जात आहे. खरे तर शेतकऱ्यांचे सोयाबीन भाव पाडून ते अंबानी, अदानींनी खरेदी करण्यासाठी हे सगळे होत आहे. एकदा शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन विकत घेतले की, मग कमी जास्त किमतीत विकण्याचा हा अजेंडा सरकारचा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे. सोयाबीन पेंडीची आयात थांबवा, पाम तेलावरच्या आयात शुल्कात वाढ करावी, सरकारने स्टॉक लिमिट सोयाबीन तेलबिया पिकावर लादली आहे, ती उठवा, अशी मागणी तुपकर (Ravikant Tupkar nagpur) यांनी केली.
25 हजार खर्चून 16 हजाराचे उत्पादन
देशाच्या सोयाबीन उत्पादनात 40 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. यंदाची पिकाची परिस्थिती पाहता सोयाबीन आणि कपाशी उत्पादनात घट झाली आहे. देशाच्या मध्यप्रदेश नंतर सगळ्यात मोठा शेतकरी वर्ग महाराष्ट्रात आहे. शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्च 25 हजार आहे. पण, मिळणारे उत्पन्न प्रति एकर चार ते पाच क्विंटल आहे. त्यामुळे 25 हजार लावून 15 ते 16 हजार रुपये हातात मिळाले, यामुळे शेतकरी हा अगोदरच एकरी 8 ते 10 हजार रुपयाने तोट्यात आहे. त्यामुळे, सोयाबीन आणि कपाशीच्या दर नियंत्रित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. यात विमा कंपन्यांना फायदा पोहोचवला जात आहे. एक मोठी लॉबी प्रशासनात कार्यरत असल्याचाही आरोप तुपकर यांनी केला. उंबरठा उत्पन्न काढण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे, असेही ते म्हणाले.