नागपूर : विदर्भातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरात ( Poddareshwar Ram mandir Nagpur) यावर्षी राम जन्मोत्सवाचा ( Ram Navami Utsav Nagpur ) उत्सव प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. तब्बल दोन वर्षानंतर भक्तांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यातही पोद्दारेश्वर राम मंदिराला यावर्षी 99 वर्ष पूर्ण झाल्याने भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर हे सर्वधर्म समभावाचं प्रतीक आहे. हिंदूसह मुस्लिम धर्माचे नागरिक देखील या उत्सवात सहभागी होतात. पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचं नव्हे तर, विदर्भाची सांस्कृतीक आणि धार्मिक ओळख झालं आहे. मंदिराला 99 वर्षांचा मोठा इतिहास आहे. एवढंचं नाही तर मध्य भारतात प्रसिद्ध असलेल्या भव्य शोभायात्रेचा वारसा देखील या मंदिराने जोपासला आहे.
पोद्दारेश्वर राम मंदिराचा इतिहास :ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर हे नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारी आहे. नागपुरातील धार्मिक कुटुंबातील जमनाधार पोद्दार यांनी १९१९ साली स्वखर्चाने मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी म्हणजे १९२३ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा जमनाधार पोद्दार यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळेच या मंदिराला पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळखले जाते. आज या घटनेला ९९ वर्षांचा ऐतिहासिक काळ पूर्ण झाला असून, मंदिराने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. १९५२ साली जमनाधार पोद्दार यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा रामकृष्ण पोद्दार आणि त्यांची मुलं मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत.
मंदिराची रचना :मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, सीताराम आणि लक्ष्मणाची मूर्ती नजरेस पडते. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवमंदिर आहे. या शिवाय मंदिरात हनुमान, विष्णू लक्ष्मी, गरुड, सुग्रीव, गंगा, महालक्ष्मीच्या मुर्त्या आहेत. जयपूरचे गोविंदराम उदयराम यांनी या मुर्त्या घडवल्या आहेत. याशिवाय अष्ठकोनी सभामंडप मंदिराची शोभा वाढवतो. पितळ आणि लाकडाचा वापर करून मंदिराचे द्वार तयार करण्यात आले आहे.