नागपूर- विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची निवड करण्यात आल्यानंतर नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी आर. विमला यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तासह जिल्हाधिकारी पदावरही महिलाराज विराजमान होणार आहे. मावळते जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही, तर अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांना धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि नागपूर महापालिकेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या जागी राज्य शासनाच्या ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोना काळात बजावली प्रभावी सेवा
राज्य सरकारने केवळ दहा दिवसांच्या अंतरात राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुसऱ्यांदा बदल्या केल्या आहेत. यात नागपूरच्या जिल्हाधिकारी पदासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीचाही समावेश आहे. ७ सप्टेंबर २०१९ रोजी रवींद्र ठाकरे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विधानसभा निवडणूक उत्तमरित्या पार पाडण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवली होती. त्यानंतर २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात सुद्धा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी प्रभावी काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे जलज शर्मा यांच्याकडे रुग्णालयाच्या बिलांच्या ऑडिटची जबाबदारी होती. रुग्णांकडून अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या हॉस्पिटलवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली होती. जलज शर्मा यांना धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्तांनंतर जिल्हाधिकारीपदी 'महिलाराज'
मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा यांची गेल्याच महिन्यात नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्राजक्ता वर्मा या भारतीय प्रशासन सेवेतील २००१ तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता नागपूर जिल्हाधिकारी म्हणून ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या २००९ तुकडीच्या प्रशासकीय अधिकारी आहेत.