मुंबई - राजकीय नेते, प्रतिष्ठित व्यक्ती खासगी सुरक्षेसाठी बाऊन्सरचा वापर करतात. मात्र आता आयएएस अधिकाऱ्यांनाही बाऊन्सरच्या सुरक्षेची भुरळ पडू लागली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःसाठी आणि पालिकेतील इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमले असल्याने आयुक्तांना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर भरोसा नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर... मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर. या शहरात सुमारे दोन कोटी नागरिक राहत असून त्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी सोयी सुविधा पुरवण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यावर त्याचे रुग्ण मुंबईतही आढळून आले आहेत. तत्कालीन पालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली.
इकबाल सिंग चहल यांनी आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यापासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्याचवेळी त्यांनी शहरातील लोकप्रतिनिधी असलेल्या व मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना भेटण्यास त्यांची कामे करण्यास त्यांच्या पत्रांना उत्तरे देण्यास दुर्लक्ष केले आहे. पालिका सभागृह, स्थायी समिती सभा, इतर वैधानिक समितीच्या, प्रभाग समिती सभा गेल्या चार महिन्यात झालेल्या नाहीत. यामुळे मुंबईकरांच्या हिताचे कोणतेही निर्णय गेल्या चार महिन्यात घेण्यात आलेले नाहीत असा आरोप नगरसेवकांचा आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: का होते मुंबापुरीची ...तुंबापुरी?
गेल्या चार महिन्यात कोरोनाचा प्रसार होत असताना त्यावर करोडो रुपये खर्च केले जात असताना आयुक्त बैठका न घेता मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कोरोना प्रसारादरम्यान पीपीई किट, ग्लोज पासून मृतदेह बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅगेपर्यत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊनही त्याची उत्तरे दिली नसल्याने भाजपाने अनेक वेळा महापौर आणि पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली आहेत.
राजकीय आंदोलनाची दहशत म्हणून पालिका आयुक्तांनी स्वतःच्या आणि इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका मुख्यालयात प्रवेश द्वारापासून आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत ईगल या खासगी सुरक्षा रक्षक कंपनीचे 18 बाऊन्सर नियुक्त केले आहेत. यावर पालिका आयुक्तांना पालिकेच्या सुरक्षा राक्षकांवर भरोसा नाही का असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. पालिका आयुक्तांना बाऊन्सर नेमण्याची गरजच काय, या बाऊन्सरवर होणारा खर्च पालिकेच्या तिजोरीतून केला जाणार की आयुक्त स्वता भरणार असे प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केले आहेत. तर नगरसेवक आणि राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन काम केले तर राजकीय पक्षांना आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही, तसेच आयुक्तांनाही आंदोलनाची भीती राहणार नाही अशी चर्चा नगरसेवकांमध्ये आहे.
हेही वाचा -फेसबुक 'अलर्ट'मुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचा वाचला जीव; मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश